चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं
बदलापुरातील (Badlapur News) प्रसिद्ध शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणप्रकरणात (Badlapur Sexual Abuse) बदलापुरातील नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळाला. यावेळी शाळेच्या बाहेर जमलेल्या संतप्त बदलापूरकर आणि पालकांनी शाळेत जाण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना शाळेच्या गेटवरच रोखलं. आंदोलकांचा रेटा वाढत चालल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत बदलापूरकरांना आज बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यापारी, स्कूल बस संघटना, रिक्षा संघटना यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. शाळा प्रशासनाने बदलापूरकरांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचं बदलापूरच्या मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका दामले यांनी सांगितलं आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे.
लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणातील हलगर्जीपणा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भोवलं आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली असून नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून किरण बालवडकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अक्षय शिंदे (24) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अक्षय हा शाळेत सफाई कामगाराचं काम करीत होता.