बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडनं (Walmik Karad) शरणागती पत्कारली आहे. कराड गेल्या काही दिवसांपासून फरार होता. अखेर त्यानं पुण्यातील CID ऑफिसमध्ये शरणागती पत्कारली. कराडनं शरणागती पत्कारल्यानंतर विरोधकांनी त्यांचे राजकीय बॉस आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे. विरोधकांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी पहिल्या दिवसापासून सांगतोय,बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या-ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर कारावाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडाचं राज्य आम्ही चालवू देणार नाही. कुणालाही या प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीनं तपास अतिशय गतीशील केलेला आहे.
त्यामुळेच आज त्यांना (वाल्मिक कराड) शरणागती पत्कारावी लागली आहे. आत्ता हत्येमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम्स कामाला लागल्या आहेत. कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढू.
( नक्की वाचा : Prajakta Mali vs Suresh Dhas : सुरेश धस यांचा यू टर्न, टीकेनंतर 24 तासांमध्ये व्यक्त केली दिलगिरी )
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांना काळजी करु नका असं आश्वासन दिलं आहे. काही वाट्टेल ते झालं तरी सर्व दोषी शोधून, ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. हा विश्वास मी त्यांना दिला आहे. वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होईल, हे पोलीस सांगतील, ते पोलिसांचं काम आहे. ही केस जाणीवपूर्वक सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्ता दिली आहे. त्य़ांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही.'
मुंडेवर कारवाई होणार?
धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, कुणी काहीही म्हणत असलं तरी पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. मला या प्रकरणाच्या राजकारणात जायचं नाही. माझ्यासाठी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. काही जणांना राजकारण महत्त्वाचं आहे, ते राजकारण लखलाभ. मला कोणत्याही राजकीय वक्तव्यात जायचं नाही. त्यांनी राजकारण करत राहवं, आमची भूमिका संतोष देशमुख यांना न्याय देण्याची आहे, तो आम्ही मिळवून देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.