Cooper Hospital doctor assault : मुंबईतील कूपर या सरकारी हॉस्पिटलमध्ये एका अत्यंत संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकाने हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागातील डॉक्टरांना थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हॉस्पिटलमध्ये काय घडलं?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूची बातमी कळताच, त्याच्या एका नातेवाईकाने रुग्णालयातील डॉक्टरांना दोषी ठरवले आणि थेट त्यांच्यावर हल्ला चढवला.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तो व्यक्ती एका डॉक्टरशी बोलत असताना अचानक मारहाण सुरू करतो. पाहता पाहता तो इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरही लाथा-बुक्क्यांचा वर्षाव सुरू करतो. हा प्रकार इतका भयानक होता की काही काळ हॉस्पिटलमध्ये WWE च्या आखाड्यासारखे दृश्य निर्माण झाले होते.
( नक्की वाचा : Dombivli News : कल्याण-शीळ रोडवर 3 दिवस Mega Traffic Block; कोणत्या वाहनांना कुठे प्रवेश बंद? वाचा सविस्तर )
उपस्थित पोलिसांसमोरही गोंधळ
विशेष म्हणजे, ज्यावेळी हा गोंधळ सुरू होता, त्यावेळी हॉस्पिटलच्या खोलीत इतर रुग्ण उपस्थित होते, तसेच 1 पोलिस कर्मचारी देखील तिथे हजर होता. पोलिस आणि उपस्थित इतर लोकांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीला कसेबसे खोलीतून बाहेर काढले.
या हल्ल्यामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तातडीने पुरेशा सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. आरोग्य सेवकांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे कूपर हॉस्पिटलमधील सुरक्षेच्या अपुऱ्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इथे पाहा Video