भूपेंद्र आंबवणे, भिवंडी
भिवंडीत 6 वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या मुलाला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला देखील छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. अमोल चव्हाण (वय 22 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर सुधीर पवार (वय 6 वर्ष) असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
भिवंडीतील हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी अमोल चव्हाण हाच घेऊन गेला. तेथे सुधीरला चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे रुग्णालयात सांगितले.परंतु डॉक्टरांनी सुधीरला मृत घोषित केले. शवविच्छेदनात सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हत्या झाल्यापासून अमोल चव्हाण हा फरार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या अमोलच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी तपासात त्याने हत्या केल्याचे कबूल केले.
हत्येचं कारण काय?
21 जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण याने सुधीरची मोठी बहीण चंपा हिच्यासोबत छेडछाड व मारहाण केली होती. सुधीरने हा सगळा प्रकार पाहिला होता. घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगणार असल्याचं सुधीर म्हणाला. त्यामुळे अमोल चव्हाणने सुधीरला इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनवा करून त्याला रुग्णालयात नेले. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक करुन 24 तासात हत्येचं गुढ उकललं.