- वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळील बजाजनगर येथील टेस्टी बिर्याणी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली
- आरोपींनी हॉटेलचे साहित्य तोडले, रोकड चोरी केली तसेच मॅनेजर दीपक यांच्यावर मारहाण केली
- घटना सीसीटीव्हीमध्ये नोंदवली गेली असून पोलिसांनी त्वरित पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे
मोहसिन शेख
मद्यधुंद तरुणांनी हॉटेलमध्ये राडा केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. बजाजनगर येथील टेस्टी बिर्याणी हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 मद्यधुंद तरुणांनी धुडगूस घातला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी हॉटेलचे मॅनेजर दीपक यांच्याशी वाद घालण्यात आला. त्यांना धमकी ही देण्यात आली. यावर त्या तरुणांचे भागले नाही. त्यांनी मॅनजेर दीपक यांना जबर मारहाण केली. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हॉटेल मालक आप्पासाहेब खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. हॉटेलचे मोठे नुकसान केले. तसेच गल्ल्यातील रोकडही काढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठी आर्थिक लूट केल्याचा ही आरोप आहे. तोडफोडीदरम्यान आरोपींपैकी एक मद्यधुंद तरुण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे बजाजनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. हा भाग तसा गजबजलेला असतो. अशा वेळी या तरुणांना कसली ही भिती न बाळगता हा राडा केला. त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या ग्राहकांची ही काळजी केली नाही. मात्र दहशत माजवण्यात ते यशस्वी झाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून अशा घटना होत आहे. त्यामुळे पोलीसांचा अशा प्रवृत्तीच्या लोकांवर काही वचक आहे की नाही असा प्रश्न झाला आहे. सर्व सामान्यांच्या ही सुरक्षेचा यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. कोणी ही कधी ही अशा पद्धतीचा राडा करत असेल तर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे याचीच चर्चा संभाजी नगरमध्ये रंगली आहे.पोलीसांनी अशा प्रवृत्तींना तातडीने चाप लावला पाहीजे अशी मागणी ही होत आहे.