ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचे कुटुंब लाचेचे पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या मेहु गावात हा प्रकार घडला. इथल्या विद्यमान महिला सरपंच, तिचा पती, मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना 40 हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेहु गावात 7 लाख रुपये किंमतीची व्यायामशाळा बांधण्यात येत आहे. यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी 2023 मध्ये धनश्री कंट्रक्शन कंपनीने सरपंच जिजाबाई पाटील यांच्याकडे मंजूर निधीची मागणी केली होती. त्यावेळी 7 लाख रुपयांपैकी 4 लाख रुपयांचा धनादेश कंपनीला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना काम सुरू करण्यास सांगण्यात आले होते.
उर्वरित 3 लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप कंपनीने केला आहे. लाच मागितल्यानंतर त्याबाबतची तक्रार संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने लुचपत विभागाकडे केली होती. दरम्यान सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांचे पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती 40 हजार रुपयांवर आणली. ही 40 हजारांची लाच ते स्विकारणार होते. त्या आधीच लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता.
सरपंचाचा मुलगा शुभम पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान पाटील हे लाच स्विकारत होते. त्याच वेळी जळगावच्या लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर सरपंच जिजाबाई गणेश पाटील, तिचा पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.