एक तरुण नेहमी घरा बाहेर झोपायला जात होता. नेहमी प्रमाणे तो शनिवारी रात्री घराबाहेर झोपण्यासाठी गेला. रविवार सकाळ झाल्यानंतर तो घरी काही परतलाच नाही. कुठे तरी बाहेर गेला असेल असं त्याच्या कुटुंबीयांना वाटले. पण त्यानंतरही बराच वेळ झाला. तो तरुण घरात आलाच नाही. मग घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. ज्यावेळी त्याचा शोध घेत गावकरी गावाबाहेरील शेततळ्या जवळ पोहोचले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. त्या तरुणाच्या घरच्यांच्या पाया खालची वाळूच सरकली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात मेहुणा हे छोट गाव आहे. या गावात आकाश बबनराव जाधव हा तरुण राहात होता. तो 22 वर्षाचा होता. त्याला रोज रात्री घरा बाहेर झोपण्याची सवय होती. सवयी प्रमाणे शनिवारी रात्री तो जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी बाहेर गेला. सकाळ झाल्यानंतर त्याचे वडील त्याला उठवण्यासाठी गेले. पण तो ज्या ठिकाणी झोपायचा त्या जागेवर आकाश दिसला नाही.
कुठे तरी बाहेर गेला असेल म्हणून सुरूवातीला घरातल्या दुर्लक्ष केलं. पण जसा वेळ पुढे गेला तसा घरातल्यांची चिंता वाढली. त्यांनी नातेवाईकांना संपर्क केला. आकाश आला आहे का अशी विचारणा केली. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. आतापर्यंत संपुर्ण गावात आकाश हरवला असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे गावकरी त्याच्या घरी जमा झाले. गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
त्याला संपुर्ण गावात शोधलं गेलं. काही लोक शेताकडे शोधत होते. हा शोध एका ठिकाणी जावून थांबला. आकाशच्या घरापासून 500 मिटर अंतरावर एक शेततळं आहे. या शेततळ्या शेजारी त्याचा जळलेला मृतदेह आढळून आला. त्याला कुणीतरी जिवंत जाळले होते. त्याचा मृतदेह पाहून गावकरी घाबरले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
त्यानंतर जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांसह बदनापूर येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आता आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आकाश याचा घातपात कोणी केला? आणि कशासाठी केला ? असा प्रश्न पोलिसांसमोर ही उभा ठाकला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपीचा शोध लावून त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.