महेंद्र वानखेडे
भाईंदर पूर्वेतील साईबाबा नगर परिसरात 2012 साली एक अत्यंत निघृण खून करण्यात आला होता. या खूनाचा मुख्य आरोपी हा त्या दिवसापासून फरार होता. त्याला तब्बल 13 वर्षांनंतर दिल्लीतून नाटकीय पद्धतीने अटक करण्यात आली आहे. काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा,कक्ष 1 ने ही कामगिरी करून दाखविली आहे. अनेक वेळा आरोपी फरार झाल्यानंतर वर्ष दोन वर्षात ती केस बंद केली जाते. पण काशिमीरा पोलिसांनी तसं केलं नाही. त्या आरोपीच्या ते सतत मागावर राहीले. शेवटी प्रयत्नाना यश येत तब्बल 13 वर्षानंतर त्याला गजाआड केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुन्हा 28 मे 2012 रोजी घडला होता. रात्री 10 वाजल्याच्या सुमारास खून करण्यात आला होता. सुरेशकुमार सूर्यनारायण चौधरी (वय ३५) या व्यक्तीचा त्याच्याच राहत्या घरात खून करण्यात आला होता. आरोपीने सुरेशकुमार यांचा गळा इलेक्ट्रिक वायरने आवळला होता. शिवाय तोंडावर चिकटपट्टी लावली होती. खलबत्त्याच्या लोखंडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर, तोंडावर मारहाण केली होती. त्यानंतर कटर व इतर धारदार हत्याराने चेहरा, छाती, पोट, हात व गुप्तांगावर वार करत निर्घृणपणे हत्या केली होती.
त्यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला. तो बिहार आणि दिल्ली येथे ओळख बदलून राहात होता. प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी बिहारमध्ये शोधमोहीम राबवली, मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अनेक वेळा तो वेश आणि नाव बदलूनही राहात होता. त्यामुळे पोलिसही त्याला पकडू शकत नव्हते.
मात्र काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणानंतर, आरोपी गोविंद कुमार हरक ऊर्फ जगतनारायण चौधरी याला दिल्ली येथून कौशल्यपूर्ण पद्धतीने अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याचा या खुनात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो गेली 13 वर्षे वेगवेगळ्या नावाने बिहार व दिल्लीमध्ये वास्तव्य करत होता. आरोपीस नवघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.