मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका अल्पवयीन मुलीच्या खुनाचा तिच्या सावत्र आईनेच खून केला. बापाने या खूनाचे पुरावे नष्ट केले. शॉक लागल्याचं गावकऱ्यांना सांगितलं गेलं. काहींना सांगितलं हार्टअटॅक आला. त्यानंतर अंतिम संस्कारही केले गेले. पुरावे नष्ट झाले होते. खून पचला होता. पण या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक पद्धतीने उलगडा झाला आहे. त्यामुळे खून करणारे आई वडील गजाआड गेले आहेत. यासाठी गावातल्या त्या लहान मुलांचे ही कौतूक होत आहे. त्यांच्या मुळेच या खूनाचा उलगडा झाला आहे. शिवाय खून पचवण्यात जवळपास यशस्वी झालेले आईवडील पोलिसांच्या जाळ्यात गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उज्जैनपासून 45 किलोमीटर दूर असलेल्या माकडोन येथे बालाराम उर्फ बालू पंवार हे कुटुंबासह राहातात. त्यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांची दुसरी पत्नी संगीता हिच्यासह ते या गावात राहातात. बालाराम यांना मधू ही मुलगी आहे. ती 13 वर्षाची आहे. मधू ही बालाराम यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. त्यामुळे दुसरी पत्नी संगीता आणि मधू यांचे जमत नव्हते. ती सावत्र लेकीचा राग करत होती. घरगुती कामावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. यामुळेच संगीताने 18 मे ला मधूचा गळा दाबून खून केला. पती घरी आल्यानंतर त्याला घटनेची माहिती मिळाली. पण त्याने पोलिसांना हे कळवण्या ऐवजी मधूच्या गळ्यावरील आणि शरीरावरील खुणा मिटवल्या. त्यानंतर त्याने मुलीचा विजेचा धक्का लागल्याने तर कुणाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय घाईघाईने अंत्यसंस्कार ही केले.
मात्र मुलीच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले. पण पोलिसांच्या पोहोचण्यापूर्वीच मधूवर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे पोलिसांकडे कोणताही पुरावा उरला नाही. पण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मुलीच्या गळ्यावरील ब्लँकेट काढताना गावातील काही मुलांनी व्हिडिओ बनवला होता. दोन दिवसांनंतर हा व्हिडिओ समोर आला. त्यात मृत मधूच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. याच आधारावर पोलिसांनी सावत्र आई संगीता आणि वडील बालू यांची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर खूनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
एसडीओपी भविष्य भास्कर यांनी सांगितले की, घरगुती वादामुळे संगीताने मुलगी मधूचा गळा दाबून खून केला होता. वडील बालू पंवार यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीसोबत मिळून मुलीवर अंत्यसंस्कार केले. जेणेकरून खुनाची घटना लपवता येईल. तपासात मिळालेले पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि जबाबांच्या आधारावर या खुनाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. दोन्ही आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात मुलांनी स्मशानात काढलेला व्हिडीओ महत्वाचा पुरावा ठरणार आहे.