Thane News: RTO च्या नावाने तुमच्या मोबाईलवर 'हा' मेसेज आलाय? सावधान, बँक खाते होऊ शकते रिकामे !

Fake e-Challan Link : सध्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलन यांसारख्या सेवांचा आधार घेऊन सर्वसामान्यांना जाळ्यात ओढत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Fake e-Challan Link : शा कोणत्याही फाईल्स किंवा ॲप्सवर विश्वास ठेवू नका. (प्रतिकात्मक फोटो)
ठाणे:

Fake e-Challan Link : राज्यातील वाहनधारक आणि चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सध्या डिजिटल युगात फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधले जात असताना आता परिवहन विभागाच्या नावाने नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चलन लिंकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

फसवणुकीची नेमकी पद्धत काय?

सायबर चोरटे सध्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलन यांसारख्या सेवांचा आधार घेऊन सर्वसामान्यांना जाळ्यात ओढत आहेत. नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवले जातात. 

यामध्ये तुमच्या वाहनाचे चलन बाकी आहे आणि ते त्वरित भरा, अन्यथा दंड आकारला जाईल किंवा तुमचे लायसन्स सस्पेंड होईल, अशी भीती घातली जाते. या संदेशासोबत एक अनधिकृत पेमेंट लिंक पाठवली जाते, ज्यावर क्लिक करताच नागरिकांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरीला जाते.

( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )

संशयास्पद ॲप्सपासून दूर राहण्याचे आवाहन

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग कधीही कोणत्याही नागरिकाला व्हॉट्सॲपवरून पेमेंट लिंक पाठवत नाही. सध्या बाजारात 'RTO Services.apk', 'mParivahan_Update.apk' किंवा 'eChallan Pay.apk' यांसारखी बनावट ॲप्स फिरत आहेत. 

Advertisement

अशा अज्ञात फाईल्स डाऊनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग डिटेल्स आणि इतर संवेदनशील माहिती हॅक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही फाईल्स किंवा ॲप्सवर विश्वास ठेवू नका.

( नक्की वाचा : Dombivli News: 100 कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार? KDMC च्या एका चुकीच्या निर्णयामुळे डोंबिवलीत संतापाची लाट )

केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा

नागरिकांनी कोणत्याही कामासाठी फक्त सरकारी अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहन नोंदणीसाठी [https://vahan.parivahan.gov.in](https://vahan.parivahan.gov.in), ड्रायव्हिंग लायसन्ससाठी [https://sarathi.parivahan.gov.in](https://sarathi.parivahan.gov.in), सामान्य परिवहन सेवांसाठी [https://www.parivahan.gov.in](https://www.parivahan.gov.in) आणि ई-चलन भरण्यासाठी [संशयास्पद लिंक काढली] या संकेतस्थळांचा वापर करावा. या सर्व वेबसाईटच्या शेवटी gov.in असे डोमेन असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या वेबसाईटच्या शेवटी .com, .online, .site किंवा .in असेल, तर तिथे आपली माहिती देऊ नये.

Advertisement

फसवणूक झाल्यास कुठे संपर्क साधाल

जर कोणासोबतही अशा प्रकारची फसवणूक झाली किंवा संशयास्पद संदेश आला, तर त्यांनी घाबरून न जाता तात्काळ कारवाई करावी. सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी सांगितले आहे की, अशा वेळी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलच्या [https://www.cybercrime.gov.in](https://www.cybercrime.gov.in) या वेबसाईटवर किंवा 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपल्या जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
 

Topics mentioned in this article