मुंबईतील दादर पूर्वेकडील भागात एका दुचाकी चोराने दुचाकी मालकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. चोर हा दुचारी चोरण्याच्या प्रयत्नात होता, त्याला हटकल्यामुळे त्याने दुचाकी मालकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दुचाकी मालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर पूर्व परिसरात कृणाल कुंडले हे जेवणाचं पार्सल घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीची चावी गाडीलाच लावलेली होती. हेच हेरुन आरोपी सोनू चंद्रन नावाच्या एका चोरट्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याचवेळी दुचाकीमालक परत आले. अज्ञात व्यक्ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याने दुचाकी चालकाने चोरास हटकले.
मी फायनान्स कंपनीचा एजंट असून चुकून तुमची गाडी उचलली जात होती अशी त्याने थाप मारली. त्यानंतर दुचाकी चालकाने अधिक विचारपूस केल्याने चोराने तिथून पळ काढला. गाडी चालकाने पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता चोराने आपल्याकडील चाकूने कृणाल यांच्या डोक्यावर पोटावर वार केले आणि पसार झाला.
नक्की वाचा - Fetus in Fetu : 4 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीच्या पोटात बाळ; रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले!
भोईवाडा पोलिसात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर आरोपीचा कुठलाही पुरावा फिर्यादीकडे नव्हता. मात्र ज्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासाला सुरुवात केली त्यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या पथकातील कर्मचाऱ्याने चोरास ओळखले. याच चोराला संबधित पोलीस कर्मचाऱ्याने काही वर्षांपूर्वी अटक केली होती.
मात्र तो सध्या कुठे राहतोय, याची कल्पना नव्हती. पोलिसांच्या खबऱ्यांमार्फत आरोपी सध्या कुर्ल्यात राहत असल्याचे कळाले. यानंतर तत्काळ भोईवाडा पोलिसांचे पथक तो राहत असलेल्या परिसरात पोहचले आणि सापळा रचून आरोपीला अटक केली. सदर आरोपी हा मूळ कर्नाटकातील असून हा महाराष्ट्रात गुन्हे करायचा आणि कर्नाटकात पळून जायचा. या आरोपीला अटक करुन त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.