राकेश गुडेकर, प्रतिनिधी
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आई आपल्या लेकराचा जीवापेक्षा जास्त जपते. स्वत:चं पोट रिकामं ठेवून मुलाला खाऊ घालते, त्याला मोठं करण्यासाठी तिची धडपड असते. मात्र दापोलीतील (Dapoli Crime News) एका आईने आर्थिक फायद्यासाठी आपल्याच पोटच्या लेकराची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दापोली तालुक्यातील एका मातेने आर्थिक फायद्यासाठी आपल्या 5 वर्षीय मुलाला विकल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी त्या मातेसह सत्यवान दत्ताराम पालशेतकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पालशेतकर हा गुहागर तालुक्यातील बोऱ्या-कारूळ येथील राहणारा आहे.
नक्की वाचा - Maharashtra Assembly Session 2025: पुणे शहराची वाहतूक कोंडीतून होणार सुटका? मंत्री माधुरी मिसाळांनी सांगितला प्लॅन
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान गुहागर एसटी स्टँडसमोर ही माता आपल्या मुलाला घेऊन गेली होती. त्यावेळी सत्यवान पालशेतकर हा तेथे मुलाला खरेदी करण्यासाठी आला होता. स्वतःला आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने मुलाच्या मातेनेच आपल्या मुलाची विक्री केल्याचे पुढे येत आहे.
सत्यवान पालशेतकर या मुलाची खरेदी करणार असल्याने त्या मूल विकणाऱ्या मातेसह दोघांवर दापोली पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 81 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.