निनाद करमरकर, प्रतिनिधी
अंबरनाथमधील एका हॉटेलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका हॉटेलमधील सॉसमध्ये चक्क मेलेल्या माशा आढळल्या आहेत. पाईपलाईन रोडवरील 5K हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथला राहणारे अॅड. महेश वाळुंज यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने 23 मे रोजी ते परिवारासह काटई पाईपलाईन रोडवरील 5 K हॉटेलमध्ये गेले होते. तिथे खाद्यपदार्थांसोबत त्यांनी सॉस मागवला. या सॉस प्लेटमध्ये ओतताच त्यांना धक्का बसला, कारण त्यात एक नव्हे, तर अनेक मेलेल्या माश्या होत्या. याबाबत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली, असा महेश वाळुंज यांचा आरोप आहे.
नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
तसंच याबाबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा वाळुंज यांनी देताच "तुम्ही कशाला पोलीस ठाण्यात जाता? पोलीस इथेच बसलेत" असं म्हणत दमदाटी केली, असा महेश वाळुंज यांचा आरोप आहे. या सगळ्या प्रकारानंतर महेश वाळुंज हे बिल भरून परिवारासह दुसऱ्या हॉटेलला गेले. मात्र या सगळ्या प्रकरणात आता या 5 K हॉटेलवर कारवाई व्हावी, यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा महेश वाळुंज दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता या हॉटेलवर एफडीएकडून सुमोटोने काही कारवाई केली जाते का? हे पाहावं लागणार आहे. या सगळ्यात 5 K हॉटेल व्यवस्थापनाने मात्र माध्यमांसमोर अद्याप त्यांची बाजू मांडलेली नाही.