आकाश सावंत, बीड:
Dhoom Style Theft CCTV Footage: गेल्या काही दिवसांपासून सोलापूर पुणे महामार्गावर प्रवाशांची लुटमार तसेच बॅगा लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत आता एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला असून चालत्या गाडीतून धूम स्टाईलने चोऱ्या होत असल्याचं उघड झाले आहे. या घटनानंतर बीडमधील पोलीस दल अलर्ट मोडवर आले असून पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. तसेच प्रवाशांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
धुळे- सोलापूर महामार्गावर धूमस्टाईल चोरी| Dhule- Solapur Highway Doom Style Theft
सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे.. याबरोबरच ट्रॅव्हल्स वर ठेवलेल्या बॅग लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांकडून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्यांचा करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे..यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात आहे.
कशी केली जाते चोरी?
ज्या ठिकाणी जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबते ती निघण्यापूर्वी चोरट्यांपैकी एक जण ट्रॅव्हल्सच्या छतावर जाऊन थांबतो त्यानंतर काही अंतरावर ही गाडी जाताच प्रवाशांच्या बॅग काढून खाली टाकल्या जातात. खाली असलेले साथीदार या बॅग गोळा करतात आणि त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करतात. टोलनाक्यावर अथवा चढाच्या ठिकाणी गाडीची गती कमी होताच वरचा चोरटा उतरून पसार होतो.
तर काही वेळेस चालत्या गाडीच्या पाठीमागे हे चोरटे दुचाकीवरून येऊन शिडीच्या माध्यमातून वरती चढून बॅग लंपास करतात. दुचाकीवर बसलेला एकजण वेगाने धावणाऱ्या वाहनावर चढतो आणि त्याचे मागील लगेज कंपार्टमेंट उघडतो व पिशव्या रस्त्यावर फेकतो, ज्या त्याचे साथीदार गोळा करतात. सोलापूर - धुळे महामार्गावर बाहेर राज्यातून येणारे प्रवासी एखाद्या बंद हॉटेल समोर गाडी थांबवून गाडीतच आराम करतात अशा प्रवाशांना चाकूचा अथवा शास्त्राचा भाग दाखवून लुटमार केली जाते.