नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Crime News : भारतीय सैन्य दलात काम करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीची किटकनाशकाचं इंजेक्शन देऊन हत्या केल्याचं प्रकरण धुळ्यात काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीसह अन्य 4 जणांच्या मदतीने नराधम पतीनं त्याच्या पत्नीला हे इंजेक्शन दिल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कपिल बाळू बागूल असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो लष्करात क्लार्क म्हणून कार्यरत आहे. कपिलचं प्रज्ञा कार्डिले नावाच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण तिची पत्नी पूजा बागूलला लागली होती. पूजाचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता.
आपल्या प्रेम प्रकरणाच्या आड पूजा येत असल्यानं कपिलनं तिची हत्या करण्याचं ठरवलं. त्यानं पत्नीची हत्या करण्यासाठी भयंकर मार्ग निवडला. त्यानं पूजाची किटकनाशकाचं इंजेक्शन देऊन हत्या केली. मृत्यूनंतर पूजाच्या मृतदेहाचे सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. त्यावेळी तिची हत्या किटकनाशकाचं इंजेक्शन देऊन करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
( नक्की वाचा : 'बायको त्रास देते,मारहाण करते', Video शूट करुन नवऱ्यानं संपवलं आयुष्य, पुण्यातील धक्कादायक घटना )
या प्रकरणात पूजाच्या भावानं केलेल्या तक्रारीनंतर कपिल बागूलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कपिलनं जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीसह अन्य 4 जणांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
भूषण काळे असं या जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. कपिल बागूलचे प्रेयसी प्रज्ञानं त्याला तब्बल 50 हजार रुपये दिल्याचा खुलासा पोलीस तपासामध्ये झाला आहे. तसेच या प्रकरणात धुळे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दौलत जाधव, 19 वर्षीय जयेश अनिल जगताप आणि दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.