नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News: धुळे तालुका पोलिस स्टेशनच्या (Dhule Taluka Police Station) आवारात आज (शुक्रवार 17 ऑक्टोबर) एक अत्यंत गंभीर घटना घडली. अकलाड (Aklad) गावचे सरपंच अजय सूर्यवंशी (Ajay Suryawanshi) आणि त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी (Kalpana Suryawanshi) यांनी स्वतःला डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलीस जाणीवपूर्वक अटक करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमका प्रकार काय?
सरपंच अजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी (Nilesh Madhav Suryawanshi) हा गावात मोकाट फिरत आहे आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे.
( नक्की वाचा : Shocking : 'फॅमिली ड्रामा'चा भयानक अंत; पत्नीच निघाली पतीची मारेकरी; सासरा, मेहुणाही तुरुंगात, नेमकं काय घडलं? )
गुन्ह्याची पार्श्वभूमी
शेती विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी हे त्यांच्या चुलत बंधूंच्या घरासमोरून जात असताना आरोपींनी त्यांच्याशी कुरापत काढली. या आरोपींनी अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीत मिरची पावडरचा वापर करण्यात आला, तसेच लाकडी कुऱ्हाडीच्या साहाय्याने अजय सूर्यवंशी यांच्या डोक्यात मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे.
या प्रकरणी अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस स्टेशनमध्ये सुरेश भदाने कुणाल भदाणे (Kunal Bhadane), निलेश सूर्यवंशी आणि माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : Ambarnath: 'तो' एक निर्णय महागात पडला! अंबरनाथच्या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची 45 लाखांची फसवणूक )
आत्मदहनाचे कारण
गुन्हा दाखल होऊनही हे सर्व आरोपी गावात खुलेआम फिरत असून, सूर्यवंशी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. पोलिसांकडून या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जाणीवपूर्वक अटक केली जात नसल्यामुळे, नाइलाजाने न्याय मिळवण्यासाठी आपण पोलिस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न करत असल्याचे सरपंच अजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
या घटनेमुळे धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.