Uttam Gogoi Murder Case: पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते. परंतु या कलियुगात विश्वासाच्या या पवित्र नात्याला कलंक लावणारी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता असेच एक प्रकरण आसाममधील दिब्रुगडमधून समोर आले आहे. जिथे एका व्यापाऱ्याची हत्या त्याच्या पत्नीने नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या मदतीने घडवून आणली. आई आणि मुलीने सुरुवातीला व्यापाऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले. पण व्यापाऱ्याच्या कापलेल्या कानामुळे या संपूर्ण प्रकरणाचे धक्कादायक रहस्य उघड झाले. दिब्रुगडमधील व्यापारी उत्तम गोगोई उर्फ सांकई यांच्या हत्येने सर्वच जण हादरून गेले आहेत. रविवारी दिब्रुगड पोलिसांनी बोरबरुआ परिसरात झालेल्या उत्तम गोगोई उर्फ सांकई यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी बॉबी गोगोई, मुलगी आणि इतर दोन तरुणांना अटक केली आहे. उत्तम गोगोई यांच्या हत्येला त्यांची पत्नी आणि मुलीने दरोड्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. व्यापाऱ्याच्या घरातून सोन्याचे दागिने आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंची लूट झाली होती, ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत आरोपींची जवळीक
या धक्कादायक हत्या प्रकरणात व्यापाऱ्याची पत्नी, मुलगी आणि दोन तरुणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, या मुलांचे पत्नी आणि मुलीसोबत जवळचे संबंध आहेत. आरोपींची ओळख बॉबी सोनोवाल गोगोई, तिची नववीत शिकणारी मुलगी आणि इतर दोन मुले अशी झाली आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की व्यापाऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोन तरुणांपैकी एकाची त्याच्या मुलीसोबत जवळीक होती.
नक्की वाचा - Jalne News: भाजप आमदाराचा कार्यकर्ता निघाला चोर, त्याने कसली चोरी केली माहित आहे का?
25 जुलै रोजी व्यापाऱ्याचा मृतदेह त्यांच्या घरी आढळला
25 जुलै रोजी उत्तम गोगोई यांचा मृतदेह जमीरा येथील लाहोन गावातील त्यांच्या घरात आढळला होता. उत्तम गोगोई यांच्या भावाने आरोप केला होता की त्यांच्या पत्नी आणि मुलीने सुरुवातीला सांगितले की उत्तम गोगोई यांना प्रेशर स्ट्रोक आला होता. उत्तम यांच्या भावाने सांगितले, "घटनेची माहिती मिळताच मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो आणि पाहिले की उत्तम गोगोई यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कान कापलेला होता. त्याच वेळी काही तरी वेगळं घडलं आहे असा संशय त्यांना आला.
व्यापाऱ्याचा कान कापलेला पाहून भावाला संशय
कान कापलेला पाहून भावाला संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना तपास करण्याची मागणी केली. उत्तम यांच्या भावाने सांगितले की, "जेव्हा आम्ही त्यांच्या कानावर कापल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा आम्हाला वाटले की ही दरोड्याची घटना आहे. जर त्यांचा मृत्यू प्रेशरमुळे झाला असता तर त्यांच्या कानावर कापलेल्या खुणा कशा आल्या? आम्ही पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. आज आम्हाला कळले की त्यांच्या पत्नी, मुलगी आणि इतर दोघांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. असं त्यांच्या भावाने सांगितले.
मुलीने गुन्हा कबूल केला
उत्तम गोगोई यांच्या हत्येबद्दल दिब्रुगडचे एसएसपी राकेश रेड्डी म्हणाले, "आम्ही उत्तम गोगोई यांच्या हत्येप्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. त्यात त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर दोन लोकांचा समावेश आहे. या सर्वांना बोरबरुआ पोलीस ठाण्यात आणले आहे. उत्तम गोगोई यांच्या मुलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि कायद्यानुसार सर्वांवर कारवाई करू. असं त्यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर दिले धरणे
दुसरीकडे, बोरबरुआ येथील स्थानिक रहिवाशांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बोरबरुआ पोलीस ठाण्यासमोर धरणेही दिले. आतापर्यंतच्या तपासणीत हत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. परंतु आरोपींची चौकशी केल्यानंतर सर्व सत्य समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. काही लोकांनी अटक केलेल्या आरोपींचे व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलीसोबत जवळचे संबंध असल्याचे सांगितले आहे.