सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Ahilyanagar Cyber Crime: सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) नावाच्या फसवणुकीच्या एका नवीन प्रकाराचा वापर करून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये (Rs 7 crore 17 lakh 25 thousand) इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून तसेच फोनद्वारे धमकावून डॉक्टरांना भीती घातली. त्याचबरोबर वेळोवेळी त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडित डॉक्टरांनी 13 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station, Ahmednagar) फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात विविध मोबाईल क्रमांक व खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कसे जाळ्यात ओढले?
फिर्यादी डॉक्टरांना 7 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून वारंवार व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्स येत होते. एका कॉलमध्ये संशयितांनी डॉक्टरांचा नंबर विचारत चौकशी केली. त्यानंतर "तुमच्यावर अवैध जाहिरात, अश्लीलता (Obscenity) आणि त्रास देण्याचे प्रकरण दाखल आहे," असे सांगितले.
यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी 'देविलाल सिंग' आणि न्यायाधीश (Judge) असल्याचे भासवून डॉक्टरांना 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे खोटे सांगितले. "तुम्ही सध्या घरात नजरकैदेत (House Arrest) आहात आणि तुमच्या प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष आहे," अशा शब्दांत डॉक्टरांना प्रचंड मानसिक दबाव आणत भीती दाखवण्यात आली.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
डॉक्टरांना धमकी
गुन्हेगारांनी डॉक्टरांना धमकावत सांगितले की, "तुमच्या खात्यात 'काळा पैसा' (Black Money) जमा झाला आहे. यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते आणि तुमच्या मुलांचे करिअर (Career) नष्ट होईल." या संपूर्ण प्रकरणावर विश्वास बसावा म्हणून आरोपींनी सर्वोच्च न्यायालय, ईडी (Enforcement Directorate) आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या नावाने तयार केलेले बनावट आदेश (Fake Orders), नोटिसा आणि ओळखपत्रं (ID Cards) डॉक्टरांना पाठवली.
या दबावामुळे भयभीत झालेल्या डॉक्टरांनी आरोपींच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये ट्रान्सफर केले.
संशय आल्यानंतर पोलिसांकडे धाव
काही दिवसांनी डॉक्टरांना या व्यवहारांबाबत आणि कागदपत्रांबाबत संशय आला. त्यांनी शहानिशा केल्यानंतर ती कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध मोबाईल नंबर व बँक खात्यांधारक अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हा शाखेकडून (Cyber Crime Branch) या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींनी वापरलेल्या मोबाईल नंबर आणि बँक खात्यांचा मागोवा घेतला जात आहे.
( नक्की वाचा : Pune News: दिवाळीच्या प्रमोशनसाठी 'ती' स्टाईल केली अन्... थेट पोलिसांनी बोलवले! रिल्स स्टारसोबत काय घडले? )
सायबर पोलिसांचा इशारा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 'डिजिटल अरेस्ट' किंवा अधिकारी असल्याचा दावा करणारे अनोळखी व्हॉट्सअॅप कॉल, संदेश किंवा कागदपत्रे पाहून नागरिकांनी घाबरू नये. कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्याआधी किंवा धमकीचे कॉल आल्यास तत्काळ सायबर हेल्पलाइन 1930 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 'डिजिटल अरेस्ट' हा फसवणुकीचा एक नवा आणि गंभीर प्रकार असून, नागरिकांनी जागरूकता व सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे.