
Dombivli News: डोंबिवली पश्चिम येथील घनश्याम गुप्ते रोडवर श्री वल्ली महिला संस्था आणि स्थानिक महिला फेरीवाल्यांमध्ये स्टॉल लावण्यावरून जोरदार वाद (राडा) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादादरम्यान आक्रमक झालेल्या एका महिला फेरीवाल्याने चक्क स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. विशेष म्हणजे, त्या महिलेच्या कडेवर असलेल्या लहान मुलाच्या अंगावरही डिझेल पडले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) अधिकारी आणि विष्णू नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
नेमके काय घडले?
दिवाळीच्या निमित्ताने वस्तू विक्रीसाठी केडीएमसीने 'श्री वल्ली महिला संस्था' या संस्थेला घनश्याम गुप्ते रोडवर स्टॉल लावण्यासाठी अधिकृत परवानगी दिली होती. आज, मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) संस्थेच्या महिला स्टॉल लावण्यासाठी घटनास्थळी गेल्या. त्यावेळी तिथं असलेल्या महिला फेरीवाल्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. यावरून दोन्ही गटांमध्ये मोठा वाद आणि संघर्ष (राडा) झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की, विरोध करणाऱ्या महिला फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यापैकी एका महिलेने संतप्त होऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. त्यावेळी कडेवर असलेल्या तिच्या लहान मुलाच्या अंगावरही काही प्रमाणात डिझेल पडले. यामुळे परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
कसा मिटला वाद?
घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे अधिकारी आणि विष्णू नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी तात्काळ घनश्याम गुप्ते रोडवर पोहोचले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रयत्नानंतर हा वाद अखेर मिटवण्यात आला.
स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलेल्या महिला फेरीवाल्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवली शहरातील फेरीवाल्यांची मुजोरी आणि नियम डावलण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world