Dombivli News : डोंबिवली एमआयडीसी फेज 2 भागातील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये (Bar & Restaurant) प्रवेश करताना एका ग्राहकाला 'धक्का' लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून, टोळक्याने एका 38 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हिंसक आणि थरारक घटना रविवार, 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर फरार झालेल्या सहा आरोपींना मानपाडा पोलिसांनी तपासचक्रांना गती देऊन मोठ्या शिताफीने नाशिकमधून अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील 'मालवण किनारा' (Malvan Kinara) या बार अँड रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारावर हा रक्तरंजित थरार घडला. गोग्रासवाडी, सरोवर बारजवळ राहणारे आकाश भानू सिंग (38) हे आपल्या मित्रांसह जेवण करण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना, चुकून त्यांचा धक्का एका अनोळखी व्यक्तीला लागला. या धक्क्याचा गैरसमज करून घेत त्या अनोळखी इसमाने लगेच आकाश सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
आकाश आणि त्यांच्या मित्रांनी 'हा धक्का चुकून लागला आहे, हेतुपुरस्सर मारला नाही,' असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो इसम ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने शिवीगाळ करत आकाशला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तातडीने आपल्या इतर साथीदारांना हॉटेलजवळ बोलावून घेतले.
( नक्की वाचा : Kalyan News: मराठी येत नाही म्हणून खाणावळीत धुडगूस; कल्याणमध्ये तरुणांचे भयानक कृत्य, मराठी व्यावसायिकाचा टाहो )
रस्त्यावर आणून केली निर्घृण हत्या
त्याचे साथीदार हॉटेलजवळ पोहोचताच, या सहा जणांच्या हिंसक टोळक्याने आकाश सिंग यांना थेट हॉटेलमधून फरफटत सार्वजनिक रस्त्यावर आणले. रस्त्यावर आधी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या सर्वांगावर चाकूने सपासप वार करून त्यांना जागीच ठार करण्यात आले.
या प्राणघातक हल्ल्यात आकाश सिंग यांना वाचवण्यासाठी सुनील कागले या तरुणाने धाडस दाखवून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळक्याने त्यांच्यावरही चाकूने वार केला, ज्यात ते जखमी झाले. या हल्ल्यानंतर आरोपींचे टोळके लगेच घटनास्थळावरून पळून गेले. नवी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणारे आकाश यांचे धाकटे बंधू बादल सिंग यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल केला.
( नक्की वाचा : Akola News : अकोला महापालिकेच्या नावाने मेसेज; 10 रुपये भरले आणि महिलेचं बँक खातं रिकामं! काय आहे प्रकरण? )
नाशिकमधून 6 आरोपी जेरबंद
या गंभीर घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी संपत फडोळ आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
मोठ्या परिश्रमानंतर पोलिसांनी या सहा आरोपींना नाशिक येथून जेरबंद केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत
अमर महाजन
अक्षयकुमार शंकर वागळे
अतुल कांबळे
निलेश ठोसर
प्रतिकसिंग चौहान
लोकेश चौधरी
मानपाडा पोलीस या सहाही आरोपींना घेऊन डोंबिवलीत परतले असून, घटनेमागील नेमका हेतू आणि पुढील तपास ते करत आहेत.