Kalyan News : कल्याण (Kalyan) शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी भाषा येत नाही या Neकारणावरून कल्याण पूर्वेकडील एका खाणावळीत नशेखोर तरुणांच्या टोळक्याने भयानक तोडफोड केली, तसेच खाणावळीतील दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे, परंतु घटनेला 24 तास उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेकडील चक्कानाका परिसरात रिद्धी खाणावळ (Riddhi Khanawal) आहे. सहा महिन्यांपूर्वीच मराठी व्यावसायिक संदीप आढाव (Sandeep Adhav) यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. या खाणावळीत काही कर्मचारी नेपाळी (Nepali) वंशाचे असून, ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 तरुण नशेत (Intoxicated) खाणावळीत आले. त्यापैकी एकाने वडापाव घेतला आणि पैशांवरून किरकोळ वाद झाला. खाणावळीतील कर्मचारी हिंदीमध्ये बोलत असल्याने त्या तरुणांपैकी एकाने कर्मचाऱ्याला 'तुला मराठी का येत नाही?' असे विचारले. कर्मचाऱ्याने, 'मी काही महिन्यांपूर्वीच नेपाळहून आलो आहे आणि मराठी शिकत आहे,' असे उत्तर दिले.हे ऐकून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या अन्य 3 मित्रांना बोलावून घेतले.
( नक्की वाचा : Thane News : घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक जामपासून सुटका होण्यासाठी सरनाईक यांनी दिले अंतिम टाईम टेबल, वाचा सविस्तर )
या 4 तरुणांनी मिळून खाणावळीची भयानक तोडफोड केली. तसेच कर्मचारी कुमार थापा आणि मदन या दोघांना बेदम मारहाण केली. मारहाण करून आणि खाणावळीचे नुकसान करून हे तरुण तेथून पळून गेले.
मराठी व्यावसायिकाचा संताप
खाणावळ चालक संदीप आढाव यांनी घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले, "आम्ही स्वतः मराठी आहोत. कसेबसे पैसे जमवून 6 महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला आहे. मराठी माणूस व्यवसाय करतोय, त्याला जगू द्या. आमचे कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकत आहेत. मारहाण करणारे हे तरुण नेहमीच परिसरात गोंधळ घालतात आणि नागरिकांना त्रास देतात. या नशेखोर तरुणांना पोलिसांनी कठोर धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणासोबत असे कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही."
( नक्की वाचा : Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले? )
आढाव यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "या घटनेत आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोण देणार? इतकी मोठी तोडफोड होऊनही घटनेला 24 तास उलटून गेले तरी कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी या चौघांच्या विरोधात ठोस कारवाई करावी."
या घटनेप्रकरणी कोळशेवाडी पोलीस (Kolsewadi Police) ठाण्यात त्या 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत," असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, घटनेला एवढा वेळ उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world