Dombivli News: धक्कादायक! 'गॅस बिल भरा अन्यथा कनेक्शन कापणार'; एका मेसेजने डोंबिवलीतील महिलेचं बँक खातं रिकामं

Dombivli News: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने सर्वसामान्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. याच भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी आता फसवणुकीची नवी पद्धत शोधून काढली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dombivli News : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
डोंबिवली:

Dombivli News:  इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने सर्वसामान्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. याच भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी आता फसवणुकीची नवी पद्धत शोधून काढली आहे. डोंबिवलीत एका नोकरदार महिलेला गॅस कनेक्शन कापले जाईल अशी खोटी भीती दाखवून तब्बल 2,99,500 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांच्या बदलत्या कार्यपद्धतीमुळे नागरिक धास्तावले आहेत.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या नोकरदार महिलेच्या पतीला गेल्या आठवड्यात एक एसएमएस आला होता. यामध्ये महानगर गॅसचे देयक भरलेले दिसत नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

Advertisement

हे देयक त्वरित अपडेट केले नाही, तर गॅस जोडणी कायमची बंद केली जाईल असा इशारा देण्यात आला होता. सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईच्या बातम्या येत असल्याने, स्मिता यांनी भीतीपोटी त्या संदेशातील नंबरवर संपर्क साधला. हीच त्यांची मोठी चूक ठरली आणि भामट्यांचे काम सोपे झाले.

( नक्की वाचा : Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार? )

अशी होती सायबर भामट्यांची नवी मोडस ऑपरेंडी

स्मिता यांनी फोन केल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना पूर्णपणे विश्वासात घेतले. तांत्रिक कारणास्तव तुमचे बिल सिस्टीममध्ये दिसत नाहीये, असे सांगून त्याने ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी लागेल असे भासवले. त्यानंतर त्याने स्मिता यांना एक लिंक पाठवली आणि ती उघडून त्यामध्ये डेबिट तसेच क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. 

प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे नाटक करत त्याने स्मिता यांना फोनवरच बोलण्यात गुंतवून ठेवले. याच दरम्यान त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 2,00,000 रुपये आणि डेबिट कार्डमधून 99,500 रुपये असे एकूण 3,00,000 रुपये लंपास केले.

( नक्की वाचा : Manmad: युद्धामुळे देशात गॅस टंचाई, पण मनमाडच्या गुरुद्वारामध्ये हजारोंचा स्वयंपाक होतोय बिनधास्त; वाचा कसं? )
 

बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्मिता राणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

सध्या या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाच्या सावटाखाली नागरिक आधीच चिंतेत असताना अशा प्रकारे गॅस कनेक्शनच्या नावाने होणारी लूट हा काळजीचा विषय बनला आहे.

 सावध राहणे आहे आवश्यक

आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक केली जात होती. मात्र आता थेट गॅस आणि वीज देयकांचा आधार घेऊन लोकांना लुटले जात आहे. कोणत्याही अधिकृत कंपनीकडून अशा प्रकारे लिंक पाठवून कार्डची माहिती विचारली जात नाही. 

Advertisement

त्यामुळे नागरिकांनी अशा संशयास्पद संदेशांना उत्तर देऊ नये आणि स्वतःहून कोणत्याही लिंकवर आपली गोपनीय माहिती भरू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article