अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli Drug Racket : डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीत छापा टाकून 2 कोटी 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. कल्याण परिमंडळ-3 च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. त्यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण डोबिवलीत नशेखोरांच्या विरोधात कल्याण पोलिस परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मोठी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी ड्रग्ज विरोधातील कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक केलीयय. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार! )
या मोहिमेच्या अंतर्गत मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वात मानपाडा पोलिसांनी लोढा पलावा परिसरातील डाऊन टाऊन या हाय प्रोफाईल सेासायटीत छापा टाकला. त्यावेळी एका घरातील चित्र पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन घसरली.
या घरातून जवळपास दोन किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे अटक करणाऱ्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. हे सर्व आरोपी इतरांना दाखवण्यासाठी कॉल सेंटर आणि खासगी कंपनीत काम करत होते. मात्र भाड्यानं घर घेऊन ड्रग्ज विक्री करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. शहरातील तरुणांना ड्रग्ज पुरवण्याचं काम हे आरोपी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य सुत्रधारासह अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीत 105 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३० किलो गांजा जप्त करुन तीन आरोपीना अटक केली आहे. त्यापैकी दोन आरोपी जालन्यातील आहेत.