Dombivli News: डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह सोसायटीची ही निवडणूक होती. या निवडणुकीत जोरदार राडा झाला. संचालक पदाच्या निवडणुकीत बोगस मतदानावरुन हा सर्व गोंधळ झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्याच्या नवऱ्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण ग्रामीण भागात असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील ऑर्चिड को.ऑ. हौसिंग सोसायटीच्या संचालक पदाची रविवारी निवडणूक होती. या निवडणुकीत गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत होती. निवडणुकीच्या काळात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानपाडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या सोसायटीची निवडणूक नियोजित वेळेनुसार सुरु झाली. दिवसभर शांततेत मतदान सुरु होतं. पण, शेवटच्या टप्प्यात या मतदानाला गालबोट लागलं. खोणी गावातील ग्रामपंचायत सदस्यांचे पती महेश ठोंबरे यांच्या एका समर्थकाचे मतदान निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केलं, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर हा सर्व वाद सुरु झाला.
( नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये स्टेशन परिसरात मसाज पार्लरमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, 10 महिलांची सुटका! )
काही नागरिकांनी महेश ठोंबरे यांना या प्रकाराची माहिती फोन करुन दिली, तसंच मतदानाच्या ठिकाणी बोलावले. त्यावेळी ठोंबरे विरोधी गटाच्या उमेदवाराच्या अंगावर धावून आल्याची माहिती आहे. ठोंबरे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत हाणामारी करत असताना मानपाडा पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचा प्रकार व्हिडिओमध्ये चित्रित झाला आहे. सोसायटीच्या निवडणुकीत थेट पोलिसांच्या अंगावरच हात टाकल्यानं खळबळ उडालीय.
महेश ठोंबरे यांचा गुन्हेगारी इतिहास डोंबिवलीकरांना चांगलाच माहिती आहे. त्यांच्यावर यापूर्वीही मानपाडा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सोसायटीच्या नागरिकांनी आता मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.