Dombivli News : गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याच्या कामामुळे आलेल्या ताण आणि नंतर झालेल्या मारहाणीमुळे पळून गेलेला डोंबिवलीचा मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे अखेर पोलिसांसमोर हजर झाला आहे. काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे भीतीने आपण पळून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सोडून दिले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील चिनार मैदानाजवळील 'आनंदी कलाकेंद्र' चालवणारा मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे हा दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. क्षमतेपेक्षा जास्त गणेश मूर्तींच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे त्याच्यावर काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रचंड ताण होता. मूर्ती वेळेवर मिळणार नाहीत या चिंतेत असतानाच, गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी काही मंडळाचे कार्यकर्ते त्याच्याकडे मूर्ती घेण्यासाठी आले. पण मूर्ती तयार नसल्याने त्यांनी प्रफुल्लला मारहाण केली. या मारहाणीमुळे आणि आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीने प्रफुल्ल डोंबिवलीतून पळून साताऱ्याला जाऊन लपला होता.
( नक्की वाचा : Ulhasnagar News : उल्हासनगर हादरले: लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर मेहुण्याने झाडल्या गोळ्या )
दुसऱ्या दिवशी, ज्या लोकांनी मूर्ती बुक केल्या होत्या, त्यांनी कलाकेंद्रासमोर मोठी गर्दी केली. मूर्ती न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रफुल्लचा शोध सुरू केला आणि तो साताऱ्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिस त्याला पकडण्यासाठी साताऱ्याला जाण्याच्या तयारीत असतानाच, प्रफुल्ल स्वतः त्याच्या आई-वडिलांसोबत विष्णूनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.
पोलिसांनी चौकशी केली असता, प्रफुल्लने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मारहाणीमुळे घाबरून आपण पळून गेल्याचे त्याने सांगितले. त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेचा असल्याने पोलिसांनी त्याला पुढील प्रक्रिया पूर्ण करून सोडून दिले.
पैशांची परतफेड करणार
प्रफुल्लच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे की, ज्या ग्राहकांनी गणेश मूर्तींसाठी पैसे दिले आहेत, त्यांच्या पावत्या पाहून सर्व रक्कम परत केली जाईल. प्रफुल्लच्या बेपत्ता होण्यामुळे अनेकांना त्रास झाला असला तरी, आता हे प्रकरण शांत होण्याची शक्यता आहे.