Dombivli News : कारखान्यात पेस्ट कंट्रोल केल्याने सात भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणात कारखाना मालक, त्यांचा भाऊ आणि एका कामगाराच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चार कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले आहेत.
कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या ७ भटक्या कुत्र्यांचा मृत्यू...
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकलव्य ॲनिमल पेडीगिरी हा कारखाना आहे. या कारखान्यात कुत्र्यांसाठी डॉग फूड तयार केले जाते. कारखाना मालक विरेंद्र कुमार निशाद यांनी काही दिवसापूर्वी कारखान्यासह आजूबाजूच्या परिसरात पेस्ट कंट्रोल केलं होते. यातच सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात परिसरातील प्राणी मित्र सुचित्रा सुर्वे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये सुचित्रा सुर्वे यांच्या आरोप आहे की, कारखाना मालक विरेंद्र कुमार निशाद, त्यांचा भाऊ आणि एका कामगाराने कारखान्यात उंदीर मारण्याचे औषध टाकले होते. ते औषध खाऊन भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर सुचित्रा सुर्वे यांच्या पतीला कारखाना मालक आणि त्यांच्या कामगारांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेल्या सात पैकी चार कुत्र्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आले आहे. हा रिपोर्ट पुढील तपासासाठी लॅबला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हेमंत ढोले करीत आहे. नक्की कुत्र्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल, मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.