अमजद खान, प्रतिनिधी
डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीत एक रील स्टारचा कारनामा उघडकीस आला आहे. हा पठ्ठ्या उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या तरुणींशी इंस्टाग्रामवर मैत्री करायचा. काही ना काही कारणे देत त्यांच्याकडून दागिने आणि पैसे घ्यायचा. या रील स्टारने अनेक तरुणींची फसवणूक केली आहे. तरुणींनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर मात्र तरुणाची तंतरली. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी प्रसिद्ध रीलस्टार शैलेश रामूगडे याला बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश रामूगडे याच्याकडून ३७ लाख रुपयांचे दागिने, जवळपास एक कोटीची बीएमडब्लू कार आणि चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत. या प्रकरणात मुंबई आणि ठाण्यात देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
मुलींच्या दागिन्यावर एैश...
डोंबिवलीत राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलीकडे असलेले दागिने अचानक गायब झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने कुठे गेले. कुटुंबीयांनी त्या तरुणीची विचारपूस केली. तेव्हा समोर आलेली माहिती धक्कादायक होती. या तरुणीने तिच्या प्रियकराला सर्व दागिने दिले होते. यानंतर कुटुंबीयांना या तरुणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. शैलेश रामूगडे असं या तरुणाचं नाव आहे. तो मोठा रिल स्टार असल्याचं सांगितलं जातं. त्याने दोन वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणखीन दोन तरुणींसोबत फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल आहे. त्याला अटक देखील झाली आहे. ही माहिती कळताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली. शैलेशने इतर तरुणींबरोबरच आपल्या लेकीचे सर्व दागिने घेतल्याचं कळताच त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नक्की वाचा - Pune Navale Bridge Accident : मराठीतील हरहुन्नरी अभिनेता दगावला; वडिलांसाठी नवस करणाऱ्या स्वातीचाही मृत्यू
शैलेश रामूगडे याला ठाण्यातील राहत्या घरातून अटक
विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहिनीनाथ सर्जेराव गमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. विष्णूनगर पोलिसांच्या तपासात समोर आलं की, शैलेश रामूगडे याने केवळ एका तरुणीला फसवलं नसून डोंबिवलीतील अनेक तरुणींना फसविलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश रामूगडे याला त्याच्या ठाण्यातील राहत्या घरातून अटक केली आहे. तो ठाण्यातील हिरानंदानी इमारतीत राहत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटीची बीएमडब्लू कार, ३७ लाखाचे दागिने आणि चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत.
तो इंस्टाग्राम तरुणींसोबत मैत्री करायचा. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो काही ना काही बहाणे करायचा. कधी ईडीची रेट पडली आहे असे सांगायचा. तर कधी काहीतरी वेगळं सांगून तरुणींकडून पैसे आणि दागिने उकळून सोडून द्यायचा. फसवणूक झालेल्या तरुणींपैकी काही उच्च शिक्षित तर काही आयटी इंजिनिअर पदावर नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. शैलैश रामूगडे याच्या विरोधात आणखीन तक्रारी येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमो यांनी दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.