Dombivli News : डोंबिवलीत महिलांना प्रेमसंबंधात अडकवून नंतर धोका देणाऱ्या एका शिक्षकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. राहुल तिवारी असे या शिक्षकाचे नाव असून, तो उल्हासनगर येथील एका प्रतिष्ठित शाळेत कार्यरत आहे. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुल तिवारीने 2011 पासून वेगवेगळ्या महिलांना फसवल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात एका शिक्षिकेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, राहुलचे या शिक्षिकेसोबत गेल्या 14 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्यांना एक मूल झाले. मात्र, मूल झाल्यानंतर राहुलने तिला सोडून दिले आणि दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले.
( नक्की वाचा : Kalyan News : केडीएमसी कर्मचाऱ्यावर कल्याणमध्ये जीवघेणा हल्ला; बदलापूरमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी सामील )
एका महिलेला सोडून दुसऱ्यासोबत लग्न
राहुलचे दुसरे लग्न काही दिवसच टिकले. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने ती माहेरी निघून गेली. यानंतर राहुलने तिसऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिलाही फसविले.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी राहुल तिवारीला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, पोलिसांनी त्याच्याकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली याचा तपास सुरू केला आहे. एका शिक्षकाकडून अशा प्रकारचे गैरकृत्य झाल्यामुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असल्याचे बोलले जात आहे.