Dombivli News: डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. येथील शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कळताच संतप्त नागरिक आणि पालकांनी मुख्याध्यापकाला पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
काय आहे प्रकरण?
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषदेची एक शाळा आहे, जिथे 6 वर्षांची पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. याच शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने मुलीसोबत गैरकृत्य केल्याची बाब समोर आली. ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिक आणि पालकांनी शाळेकडे धाव घेतली आणि आरोपी महेंद्र खैरनार याला पकडले. संतप्त नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता आरोपीला मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.
( नक्की वाचा : Kalyan: कल्याणमध्ये पोलीस ठाण्यातच 'राडा', मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण; वाचा काय आहे प्रकरण? )
फाशीची मागणी
शाळेतील एका जबाबदार व्यक्तीनेच असे गैरकृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची तीव्र मागणी केली आहे.
नागरिकांच्या मागणीनंतर आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानपाडा पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. त्यांनी आरोपी महेंद्र खैरनार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan: कल्याणच्या शिवसेना नेत्यांना संपवण्याची सुपारी? शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, पुरावाही सादर )
'2019' मध्येही असाच प्रकार?
या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्येही असाच प्रकार केला होता, परंतु त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती. आताच्या या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि कल्याण ग्रामीण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.