जाहिरात

Ashok Kharat : खरातच्या बंगल्यात एसआयटीची थरारक एन्ट्री! पत्नी फरार, मुलाला या पद्धतीनं पोलिसांनी उचललं

Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी आणि तितकीच नाट्यमय घडामोड घडली आहे.

Ashok Kharat : खरातच्या बंगल्यात एसआयटीची थरारक एन्ट्री! पत्नी फरार, मुलाला या पद्धतीनं पोलिसांनी उचललं
Ashok Kharat Case: अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे.
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी आणि तितकीच नाट्यमय घडामोड घडली आहे. विशेष तपास पथकाने म्हणजेच SIT ने खरात याच्या बंगल्यावर छापा टाकला असून त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या चित्रपटाला साजेसा असा होता. मर्चंट नेव्हीतील कॅप्टन ते ज्योतिषी आणि त्यानंतर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेला अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे, मात्र आता या तपासाची व्याप्ती त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या कर्मयोगी नगर भागात अशोक खरात याचा तृप्तबाला नावाचा बंगला आहे. या ठिकाणी SIT चे पथक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी पोहोचले होते. पथकामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष अधिकारी यांचा समावेश होता. पोलिसांनी बंगल्याचे गेट ठोठावले, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

अखेर तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी शेजारील बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारून खरात याच्या बंगल्यात प्रवेश केला. पोलिसांनी संपूर्ण घर आणि गार्डनची कसून झडती घेतली, मात्र कल्पना खरात तिथे सापडली नाही. त्या फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( नक्की वाचा : Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप )

मुलगा ताब्यात

बंगल्यात कल्पना खरात न सापडल्याने पोलिसांनी अखेर अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन याच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही, तरीही तपासाच्या अनुषंगाने त्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे चौकशीसाठी नेण्यात आले आहे. गेल्या 13 दिवसांपासून अशोक खरात याची SIT कडून चौकशी सुरू असतानाच आता त्याच्या मुलाला ताब्यात घेतल्याने या प्रकरणात नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

अशोक खरात याच्यावर केवळ लैंगिक शोषणाचेच नाही, तर जमिनीच्या फसवणुकीचेही गंभीर आरोप आहेत. शिर्डी येथील 4 एकर जमिनीच्या खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि इतर 5 जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

जमिनीचे मालक रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनुसार, कर्ज फेडण्याच्या बहाण्याने व्याजाने पैसे देऊन जमीन हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तीन आरोपी आधीच ताब्यात असून, खरात कुटुंबाच्या शिर्डीतील कोट्यवधींच्या मालमत्तेची आता SIT कडून चौकशी केली जात आहे.

अशोक खरात हा पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत होता, त्यानंतर तो ज्योतिषी बनला. याच ज्योतिषाच्या आड त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. तपासात असे समोर आले आहे की, खरात त्याचे जाळे विणण्यासाठी 4 वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत असे. 

पहिले सिम कार्ड केवळ महिलांशी संपर्क साधण्यासाठी, दुसरे व्हीआयपी आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी, तिसरे आर्थिक व्यवहारांसाठी आणि चौथे सामान्य लोकांसाठी वापरले जात होते. खरात याची पोलीस कोठडी बुधवारी संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com