छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत आल्यानंतर एका मुलीने शिक्षकांना राधे-राधे म्हणत अभिवादन केलं. याचा राग आल्याने साडेतीन वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. या मुलीने राधे-राधे म्हटल्याने राग आल्याने या शाळेची मुख्याध्यापिका ईला कोल्विन हिने मुलीचे तोंड चिकटपट्टीने बंद केले आणि नंतर तिला मारहाण केली असा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांमध्ये पालकांनी तक्रार केल्यानंतर ईला कोल्विनला अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा: EMI थकले म्हणून बँकवाले बायकोला घेऊन गेले; खासगी बँक कर्मचाऱ्यांचा संतापजनक कृत्य )
पोलिसांनी या घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, नंदिनी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बागडुमर परिसरातील मदर टेरेसा इंग्रजी शाळेत बुधवारी हा सगळा प्रकार घडला होता. मुलीचे वडील प्रवीण यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ईला कोल्विनला अटक केली. पोलीस तक्रारीत प्रवीण यांनी म्हटले होते की त्यांची मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिने पालकांना शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिने म्हटले की, शाळेत आल्यानंतर तिने शिक्षकांना 'राधे-राधे' असे म्हणून अभिवादन केले. यामुळे मुख्याध्यापिका ईला कोल्विन संतापल्या. त्यांनी तोंडाला चिकटपट्टी लावून मारहाण केली.
( नक्की वाचा: चीनचे चीड आणणारे कृत्य! भगवान जगन्नाथांचा अपमान, गुन्हा दाखल )
प्रवीण यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण कायदा 2015 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून ईला कोल्विनला अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.