
Uttar Pradesh News : कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून महिलेला बँकेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यात एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हे संतापजनक कृत्य केलं आहे. या घटनेमुळे बँकेच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे.
झाशीमधील एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूजा वर्मा नावाच्या महिलेला कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी ताब्यात घेतले. पूजा वर्मा यांचा नवरा रविंद्र वर्मा याने 112 या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बायकोला बँकेत डांबून ठेवले आणि जोपर्यंत कर्जाचे पैसे भरले जात नाहीत, तोपर्यंत तिला सोडणार नाहीत, असं सांगितलं.
(नक्की वाचा- VIDEO: हे वागणं बरं नव्हं! नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं मंत्र्यांसमोर लोटांगण)
रविंद्र वर्मा यांचा फोन आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे पाहून बँक कर्मचाऱ्यांनी पूजा वर्मा यांना सोडून दिले. यानंतर पूजा वर्मा यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी 40,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते आणि त्याचे 11 हप्ते भरले होते, परंतु बँकेच्या नोंदीनुसार फक्त 8 हप्तेच भरल्याचे दिसत होते. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी 3 हप्त्यांचे पैसे स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
बँकेचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, बँकेच्या व्यवस्थापकाने पूजा वर्मा यांचा आरोप फेटाळला आहे. व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, पूजा वर्मा मागील 7 महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरत नव्हत्या आणि त्या त्यांच्या पतीसोबत स्वतःहून बँकेत आल्या होत्या. त्यांना कोणीही जबरदस्तीने थांबवले नव्हते.
(नक्की वाचा- Pune News: 'मल्हार' गडावर बेशिस्त पर्यटकांना जागरूक नागरिकाचा दणका, VIDEO पाहून अभिमान वाटेल)
स्थानिक पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे ग्राहकांना डांबून ठेवल्याच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world