छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण डोंबिवलीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत काहींनी गैरफायदा घेण्याचा डाव आखला होता. त्यामुळे काही चोर या गर्दीत घुसले होते. पण या चोरांचा डाव एका सेल्फीमुळे उधळला गेला. शिवाय ते कार्यक्रम स्थळीच अलगद पकडले गेले. त्यांच्याकडून सोन्याची चैनही हस्तगत करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपवल्यानंतर शिंदे दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला निघाले. त्यावेळी ते स्टेजवरून खाली उतरत होते. त्यावेळी स्टेज खाली त्यांना भेटण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीत तीन चोरही होते. गर्दीचा फायदा घेत हात साफ करण्याचा त्यांचा डाव होता. त्यामुळे ते आपल्या शिकारीच्या शोधात होते.
त्यावेळी एक तरुणही तिथे शिंदेना भेटण्यासाठी उभा होता. त्याच्या गळ्यात सोन्याची महागडी चैन होती. बरोबर त्याच्या मागे गणेश पाटील होते. पाटील हे पेश्याने वकील आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते सेल्फी काढण्यात व्यस्त होते. त्याच वेळी त्यांना काही सेल्फीमध्ये काही तरी वेगळे दिसले. काही जण चोरी करत असल्याचं त्यांना या सेल्फी मध्ये आढळलं.
त्या तरुणाचा गळ्यातील महागडी चैन त्या तीन चोरांनी पद्धतशीर पणे चोरली होती. मात्र गणेश पाटील यांच्या सेल्फीमुळे या चोरट्यांचा डाव फसला. गणेश पाटील यांची नजर एका चोरट्यावर वर गेली. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्या चोरांना ताब्यात घेतेले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चोरलेली चेन त्याच्या हातात सापडली. मानपाडा पोलिसांनी सुनील म्हस्के नावाच्या या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याचा इतर दोन साथीदार चोरट्यांच्या शोध पोलीस घेत आहेत.