
संजय तिवारी, नागपूर: नागपूरमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर शहरातील महाल परिसरामध्ये दोन गटात मोठा तणाव झाल्याचे समोर आले आहे. दोन गट समोरासमोर आल्याने हा राडा झाल्याचे समोर आले असून यामध्ये काही नागरिक आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला असून सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आंदोलन झाले. औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन याठिकाणी चर्चा झाली तसेच घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वातावरण शांत झाले होते. अशातच सायंकाळी काही समाजविघटक जमावाने एकत्र येऊन त्यांनी दगडफेक तसेच जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. काही लोकांनी पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावल्याने याठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र पोलीस जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला असून ज्यामध्ये ते जखमी झालेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world