Ulhasnagar : उल्हासनगरच्या पर्यावरण कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांचे निधन; गंभीर आरोपांमुळे आत्महत्येचा संशय

Ulhasnagar News :  उल्हासनगरमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि ॲक्टिविस्ट ॲड. सरिता खानचंदानी यांनी इमारतीवरून उडी मारून जीव दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ulhasnagar News :   ॲड. सरिता खानचंदानी यांचे उपचाराच्या दरम्यान निधन झाले.
मुंबई:

Ulhasnagar News :  उल्हासनगरमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि ॲक्टिविस्ट ॲड. सरिता खानचंदानी यांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका तरुणीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आज सकाळी (बुधवार, 28 ऑगस्ट) कॅम्प 4 येथील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनसमोरील रोमा अपार्टमेंट इमारतीवरून सरिता खानचंदानी यांनी उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना मॅक्सिलाइफ रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

( नक्की वाचा : अखेर डोंबिवलीतील फरार मूर्तीकार पोलिसांपुढे हजर, पळून गेल्याचं सांगितलं कारण )
 

पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान

ॲड. सरिता खानचंदानी या ‘हिराली फाउंडेशन' या एनजीओच्या संस्थापक होत्या. त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.

त्यांनी शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा कायदेशीर लढा दिला. रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे आणि मिरवणुकीतील नियमबाह्य आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मोठे यश मिळाले.

खानचंदानी यांनी वालधुनी नदीच्या प्रदूषणाविरोधातही अनेक याचिका दाखल केल्या होत्या. नागरिकांना स्वच्छ पर्यावरण मिळावे यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या.

सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यामुळे त्या उल्हासनगर शहरात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article