राहुल तपासे, प्रतिनिधी
Karad News : कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटी 10 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विंग गावातून अटक केली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह एकूण सुमारे 50 जणांविरोधात 12 ऑक्टोबर 2025 रोजी कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बोगस कर्ज वितरणातून कोट्यवधींचा अपहार
बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्याने कर्जखाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवणे, असे गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहेत.
नक्की वाचा - Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचं खरं कारण कळणार; बारामतीतून दिलासा देणारं दृश्य आलं समोर
९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 61, 316 (2), 316 (4), 318 (4), 336 (3), 338, 339, 340 (2) आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित कलमे अजामीनपात्र असल्याने आरोपींवर अटकेची कारवाई सुरू आहे.
ईडीचीही धाड
दरम्यान, या प्रकरणात प्रवर्तन संचालनालय (ईडी) कडूनही कारवाई करण्यात आली असून, चरेगावकर यांच्या बंगल्यावर तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग आला असून, या घोटाळ्यात आणखी कोणती नावे समोर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील या प्रचंड आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.