योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने भारतीय चलनातील बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 500 रुपयांच्या एकूण 194 बनावट नोटा,म्हणजेच 97 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. 17 जुलै रोजी पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की,गुडधी येथील चंदन भिमराव घांडोरे हा बनावट नोटा बाजारात खऱ्या नोटांप्रमाणे चलनात आणण्याच्या तयारीत आहे.
ही माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने गुडधी परिसरातील आलीयाबाद रोडवर सापळा रचून चंदन घांडोरे याला ताब्यात घेतले.त्यानंतर झडती घेतली असता 500 रुपयांच्या 21 बनावट नोटा आढळून आल्या.पंचांसमक्ष तपासणी केली असता त्या भारतीय चलनातील नकली नोटा असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीतून उलगडले संपूर्ण रॅकेट
यादरम्यान,चंदन घांडोरे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने या नोटा मुर्तीजापूर येथील जहीरोद्दीन जबिरोद्दीन याच्याकडून घेतल्याची माहिती दिली.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुर्तीजापूरला रवाना झाले.आसरा फाटा परिसरात सापळा रचून जहीरोद्दीनला ताब्यात घेण्यात आले.त्याच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 173 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
नक्की वाचा >> Miss World स्पर्धेत पाकिस्तानची पहिल्यांदाच एन्ट्री, अनिका जमालने सोशल मीडियावर मार्केट केलंय जाम, पाहा Photos
पुढील चौकशीत त्याने या नोटा गुडधी येथील विठ्ठल संजय वारोकार याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी विठ्ठल वारोकार यालाही ताब्यात घेतले.त्याच्या चौकशीत डोणगाव,जिल्हा बुलडाणा येथील एका व्यक्तीकडून या बनावट नोटा आणल्याची माहिती समोर आली.आरोपी या नोटा बाजारात खऱ्या चलनी नोटांप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बनावट नोटा कुठे छापल्या?
या प्रकरणी चंदन भिमराव घांडोरे,जहीरोद्दीन जबिरोद्दीन आणि विठ्ठल संजय वारोकार या तिघांविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 180 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे. बनावट नोटा कुठे छापल्या जात होत्या आणि त्या राज्यातील इतर भागात पुरवल्या गेल्या का,याचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.या कारवाईमुळे बनावट चलनी नोटांच्या अवैध रॅकेटला मोठा धक्का बसला असून आर्थिक फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.