अमजद खान, डोंबिवली
हमालाला काम दिले नाही म्हणून ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. आमच्या हमालाला माल उतरवण्याचे काम देत नाही या रागातून ट्रक चालकावर धारदार शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या चालकावर उपचार सुरु आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी दोन आरोपींपैकी एकाला अटक केले आहे. अक्षय कारंडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल पानवलकर याचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाई या इमारतीचे प्लास्टरचे काम सुरु आहे. प्लास्टरसाठी लागणारा माल घेऊन एक ट्रक तिथे आला होता. या दरम्यान माल इमारतीसमोर उतरवण्याचे काम सुरु होते. काम सुरु असताना त्याठिकाणी दोन जण आले आणि त्यांनी ट्रक चालकाला गाडीमधून खाली उतरवले.
(नक्की वाचा- धक्कादायक! 8 वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचार)
ट्रक चालक बालाजी कोपनर याच्याशी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. आमच्या परिसरात येऊन माल खाली करतोय. आमच्या हमालांना माल उतवरण्याचे काम का देत नाही. तुला हे करण्यास कोणी सांगितले, असा जाब या दोघांना ट्रक चालकांना विचारला.
मी माझं काम करतोय, माझ्याशी का वाद कशाला घालता, असं उत्तर ट्रक चालकाने या दोघांना दिलं. मात्र यावरुन आरोपींनी ट्रक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ट्रक चालकाच्या मानेवर आणि शरीरावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(नक्की वाचा- पुण्यात घृणास्पद कृत्य! पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं; चावी हरवल्याने किळसवाणा प्रकार उघड)
या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अक्षय कारंडे याला अटक केली आहे. अक्षय याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय मानला जात आहे. दुसरा आरोप विशाल पानवलकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.