FDA Official Under Scrutiny: अन्न आणि औषध प्रशासन विभाग (FDA) सध्या लाचखोरी आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा आणि संशयाचा विषय ठरला आहे. या विभागातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कडक पावले उचलली जातील असे वाटत असतानाच, आता एका बड्या अधिकाऱ्याविरोधातील तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली आहे.
विभागातील काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गांनी संपत्ती गोळा करत असल्याची कुजबूज आधीपासूनच होती, मात्र आता पुराव्यांसह तक्रारी समोर येऊ लागल्याने खळबळ माजली आहे. दोन आमदारांनी वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.
आमदारांच्या तक्रारीनंतरही कारवाईकडे पाठ
भाजप आमदार श्वेता महाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उल्हास इंगोले नावाच्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणी प्रशासनाकडून विभागीय चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही.
या आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने आता सूरज पडवळकर नावाच्या व्यक्तीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. एकाच महत्त्वाच्या पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यावर सरकारची नेमकी मेहेरनजर का, असा जळजळीत सवाल आता तक्रारदाराने उपस्थित केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )
गुटखा विक्रीत सहभागाचे गंभीर आरोप
राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. मात्र, आता एफडीएचे अधिकारीच या काळ्या बाजारात सामील असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी उल्हास इंगोले हे गुटखा विक्रीच्या साखळीत सहभागी असल्याचा थेट आरोप केला होता.
त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती जमा केल्याचेही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांनीही चौकशीची मागणी केली होती. भ्रष्टाचाराच्या या गंभीर आरोपांमुळे विभागाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, दोषींवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )
बेकायदेशीर पदभार आणि अधिकारांचा अतिवापर
उल्हास इंगोले यांनी मुख्यालय सह आयुक्त (अन्न) या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे आपल्याकडेच ठेवल्याचा आरोप सूरज पडवळकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. नियमानुसार एकाच व्यक्तीकडे इतका काळ हा प्रभार राहू शकत नाही, तरीही तो त्यांच्याकडेच कसा राहिला, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे, महाराष्ट्र पोलिसांना जप्त केलेले नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत देण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश इंगोले यांनी काढला होता. असा आदेश काढण्याचे कायदेशीर अधिकार त्यांना कोणी दिले आणि यामागे कोणाला वाचवण्याचा उद्देश होता, याचा शोध घेण्याची मागणी तक्रारदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world