नवी मुंबईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून शनिवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. मविआचे उमेदवार राजन विचारे उद्या 29 एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेच. मात्र त्यांच्यासोबत असणापे निष्ठावंत मढवी मात्र पोलीस कोठडीत आहेत.
केबल टाकण्यासाठी ठेकेदाराकडून अडीच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मढवी यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या वादातून त्यांनी मढवी यांनी उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात केबलची वायर टाकायची असल्यास मला अडीच लाख द्या, अशी मागणी मढवी यांनी ठेकेदारांना केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पहिला हप्ता दीड लाख घेतला आणि शनिवारी 1 लाख रुपये घेतना खंडणी पथकाने मढवी यांना रंगेहाथ पकडलं आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांना आणि त्यांचा चालक अनिल मोरे यांना विशेष सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आलं होतं.
नक्की वाचा - 'कुंकू लावायचा असेल तर एकाचाच लावा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
पुढील तपासासाठी ठाणे न्यायालयात खंडणी विरोधी पथकाने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.