महावितरणच्या कार्यालयता चक्क पत्त्यांचा डाव रंगला होता. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या खुर्चीत बसून हे सर्व सुरू होते. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांच्या समस्या सोडवायच्या सोडून कार्यालयात बसून पत्त्याचा डाव रंगला होता. याची दखल आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. हा सर्व प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती इथल्या कार्यालयात घडला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आता आदेश देण्यात आले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम जिवती या तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या एका लाईनमनचा कारनामा समोर आला आहे. उपकार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीत बसून हा लाईनमन चक्क जुगार खेळताना दिसून आला आहे. त्याचा व्हीडिओ NDTV च्या हाती लागला. रवींद्र गंधारे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो प्रधानतंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. जिवती हा दुर्गम तालुका असल्याने इथे विजेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते.
ट्रेंडिंग बातमी - चिकनपाडा तिहेरी हत्याकांडाचा छडा लागला, आरोपीची एक चुक अन् खेळ खल्लास
लाईनमन आणि तंत्रज्ञ तक्रारींचा निपटारा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबतात. पण याचा गैरफायदा उचलत गंधारे हा सहकाऱ्यांना घेवून वरिष्ठांच्या खुर्चीत बसून पत्त्यांचा डाव रंगवत बसतो. इतकेच नाही तर लोकांच्या तक्रारी टाळण्यासाठी हा फोन बंद करून पत्ते खेळतो असा त्याच्यावर आरोप आहे. समस्या निवारणासाठी किंवा नवीन जोडणी देण्यासाठीही तो लोकांकडून पैसे मागतो. पैसे घेतल्याशिवाय तो लोकांचे काम करीत नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. आता या गंभीर प्रकरणात तो सापडल्याने त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली.