Ghatkopar hoarding case : 17 जणांचा जीव घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला जामीन 

'घाटकोपर होर्डिंग प्रकरण हे नैसर्गिक रित्या घडले असून ही देवाची करणी असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते. यामध्ये कोणाचाही मृत्यू व्हावा असा माझा हेतू नव्हता.'

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील (Ghatkopar hoarding case) आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याला सत्र न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. बेकायदेशीर असलेलं होर्डिंग कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 80 हून अधिक जण या प्रकरणात जखमी झाले होते. होर्डिंग लावणाऱ्या इगो कंपनीचा मालक याला पोलिसांनी 17 मे रोजी अटक केली होती. मात्र आता भावेश भिंडेची जामिनावर सुटका झाली आहे. भावेश भिंडे या प्रकरणात उच्च न्यायालयातही गेला होता. यावेळी उच्च न्यायालयात त्याने ही अटकच बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता.  

मात्र उच्च न्यायालयाने ही अटक योग्य असल्याचे सांगत त्याच्या या मुद्द्याला फेटाळून लावले. त्यानंतर भावेश भिंडे याने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज आता मंजूर झाला आहे. घाटकोपर होर्डिंग प्रकरण हे नैसर्गिक रित्या घडले असून ही देवाची करणी असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते. यामध्ये कोणाचाही मृत्यू व्हावा असा माझा हेतू नव्हता अशी बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. अखेर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एम पाठाडे यांनी हा आदेश दिला आहे. 

नक्की वाचा - होर्डिंगच्या मालकामुळे 14 जणांचे हकनाक बळी; नववी फेल असलेला भावेश भिंडे कोण आहे? 

17 जणांचा जीव घेणारं घाटकोपर होर्डिंग प्रकरण..
मुंबईत सोमवारी झालेल्या वादळामध्ये घाटकोपरमध्ये भावेशच्या कंपनीनं लावलेलं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण या प्रकरणात जखमी झाले होते. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडटचा मालक असून त्याच्या कंपनीनं हे होर्डिंग उभारलं होतं.  या दुर्घटनेत एफआयआर दाखल झाल्यापासूनच भावेश फरार होता. त्याच्या विरोधात यापूर्वीच 20 पेक्षा जास्त प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एका बलात्काराच्या प्रकरणाचा समावेश आहे. 

घाटकोपरच्या पेंट्रोलपंपाजवळ पडलेल्या या होर्डिंगचा आकार  120X120 फुट होता. त्यासाठी या होर्डिंगचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश करण्यात आला होता. दुसरीकडे आम्ही 40X40 फुट आकारापेक्षा मोठ्या होर्डिंगला परवानगी देत नाही, असं  मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय.