अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे मुंबईत झालेल्या अपघातानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मृतांचा आकडा वाढला असून होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे.
दरम्यान या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखेच्या कक्ष सहाचे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. ज्या कंपनीने हे होर्डिंग लावले होते त्याचा मालक भावेश भिंडे याच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास केला जात असल्याची माहिती आहे.
राज्यभरात होर्डिंग्समुळे दहशत...
21 मे रोजी पुणे बंगलोर महामार्गावर हॉटेल फर्नच्या समोरील महाकाय होर्डिंग सोमवारी झालेल्या वादळी पाऊसामुळे कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घाटकोपर दुर्घटनेनंतर साताऱ्यातील अशा होर्डिंग्जची दहशत निर्माण झाली आहे.
नक्की वाचा - 'इंजिनीयर लेक कायमची गेली, आता...'; पुणे अपघातात जीव गमावणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाचा शोक अनावर
अनधिकृत होर्डिंग धारकांविरुद्ध वाशिम नगरपरिषदेची कारवाई
घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर वाशिम शहरात अनधिकृत लावलेल्या होर्डिंग धारकांना नोटीस बजावल्या होत्या तसेच दोन दिवसात होर्डिंग काढण्यासाठी अलटिमेटम देण्यात आला होता. त्यानंतर आता ज्या अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस व अलटिमेटम देऊनही होर्डिंग काढले नाही अशा अनधिकृत होर्डिंग धारकांविरुध्द कारवाई करण्यात येत असून शहरातील विविध ठिकाणच्या मुख्य चौकांतील लावण्यात आलेले सर्व अनधिकृत होर्डिंग्स वाशिम नगर परिषदेकडून काढण्यास येत आहे, असे सीईओ निलेश गायकवाड यांनी सांगितल आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले. यात 24 अनधिकृत होर्डिंग असल्याचं आढळून आलं आहे. हे सर्व अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्यानंतर हे होर्डिंग काढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान ज्याच्या जागेत हे अनधिकृत होर्डिंग आहे आणि ज्याने हे होर्डींग लावले त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.