महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असताना परभणी जिल्ह्यातील एका कुटुंबात आंतरजातीय विवाहावरुन एका 19 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या आई-वडिलांनीच मुलीची हत्या केली आणि नातेवाईकांच्या मदतीने स्मशानभूमीत तिचा मृतदेह परस्पर जाळण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
परभणीतील पालम तालुक्यातील नाव्हा येथील एका 19 वर्षांच्या तरुणीची तिच्या आई-वडिलांनी गळा दाबून हत्या केली. यानंतर भावकीतील काही जणांच्या मदतीने तिचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मुलीचं गावातील एका तरुणावर प्रेम होतं. तिला त्याच्यासोबत लग्नही करायचं होतं. मात्र मुलगा दुसऱ्या जातीतील असल्याने कुटुंबाचा याचा विरोध होता. मात्र मुलगी आंतरजातीय विवाहासाठी ठाम होती. मुलीने आपल्या नकळत प्रेमविवाह करू नये यासाठी तिच्या आई-वडिलांनी घरातच तिचा गळा दाबून हत्या केली. ते इथवरच थांबले नाही. गावातील भावकीच्या मदतीने तिचा मृतदेह जवळच्या स्मशानभूमीत नेण्यात आला. इथं तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा - कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल
21 एप्रिल रोजी आई-वडिलांनी रात्री 10 ते पहाटे दरम्यान तिची गळा दाबून हत्या केली आणि कोणालाही कळू न देता काही लोकांसोबत तिचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात वडील बाळासाहेब भीमराम बाबर, आई रुक्मिनीबाई बाळासाहेब बाबर यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.