शिर्डीतील हॉटेल साई सुनिता येथून गेल्या पंधरवड्यात चोरट्यांनी तब्बल 3 कोटी 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय घेत शिर्डी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांची होलसेल सोन्याच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन होलसेल व्यापार करण्याकरिता शिर्डीत मुक्कामी आले होते. त्यांच्या ताब्यात सुमारे साडे तीन किलो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. याच दरम्यान त्यांच्या चालकाने संधी साधत हा मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा केला होता. याबाबत सुवर्ण व्यापारी विजय सिंह खिशी यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद देखील दाखल केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी हा मुंबई-पुण्याच्या मार्गाने थेट आपल्या मूळ गावी राजस्थानला पळाल्याचे निष्पन्न झाले.
नक्की वाचा - Akola Crime : बेडरूममध्ये झोपायला गेले अन् घात झाला; 9 वर्षीय स्वराजचा गाढ झोपेत मत्यू, काही वेळाने वडिलही दगावले
शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी हाती लागला नाही. तर आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने पुढे येत गुन्ह्यातील 2 कोटी 59 लाख 103 रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडे जमा केले. आरोपी सुरेशकुमार याने शिर्डी येथून चोरून नेलेले सोन्याचे दागिने राजस्थान येथे आपल्या घरी ठेवले आणि तो गायब झाल्याचं सांगण्यात आलंय. पोलिसांनी पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसुत्र वाट्या, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला आहे.