गोंदवले येथे एका अल्पवयीन मुलीने फोनवरून येणाऱ्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातारा येथे पोक्सो गुन्ह्यातील जामीनावर सुटलेला आरोपी तस्लिम मोहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार, तस्लिम खान हा फोनवरून आईला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलीने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वीही तो फोनवरून वारंवार त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तस्लिम हा याअगोदर संबंधित मुलीला त्रास देत होता. तस्लिम पॉक्सो गुन्ह्यात सातारा येथे अटकेत होता. जामिनावर सुटल्यावर तो फोन करून त्रास देत होता.
हे कुटुंब साताऱ्यात राहतात. अस्मिता (बदलेले नाव) हिच्यावर तस्लिमने अतिप्रसंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याअंतर्गत तब्बल तीन महिने तो तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो अस्मिताशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. ही बाब अस्मिताच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर तस्लिम याला समज देण्यात आली. मात्र तरीही त्याने ऐकलं नाही. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अस्मिताने स्वतः ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
नक्की वाचा - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
ही बाब साताऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात आल्यावर संघटना तसेच नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. रास्ता रोको केला. तसेच तस्लिमला तातडीने फासावर लटकविण्याची मागणी केली. सातारा शहरातील मुख्य रस्त्यावर अस्मिताचे नातेवाईक ठाण मांडून बसले होते. सातारा पोलिसांनी यावेळी आंदोलकांना तसेच नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची बाजू समजून योग्य कारवाईचे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिले.