Govind Pansare murder case : पुरोगामी नेते, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याचं माहिती आहे. समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दहा वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. सकाळच्या वेळेत घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी ते मरण पावले. या प्रकरणात १० संशयितांपैकी समीर गायकवाड हा एक होता. समीर गायकवाड याचा संबंध सनातन संस्थेशी होता.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...
गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सांगलीतील घरात समीर गायकवाड याचा मृत्यू झाला. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड संशयित आरोपी होता.