गुजरातमधील अहमदाबादमधील खोकरा भागात एका आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेनंतर शहरात संतापाचं वातावरण आहे. आठवीतील एका विद्यार्थ्याने शाळेबाहेर दहावीतील सीरियन विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये नयनचा मृत्यू झाला आहे. पोलीस तपासात आरोपी आणि त्याच्या एका मित्रामधील एक इंस्टाग्राम चॅट समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपीने उघडपणे आपला गुन्हा कबूल केला आहे. संपूर्ण चॅटमध्ये काय चर्चा झाली ते जाणून घेऊया.
चॅटची सुरुवात मित्राच्या मेसेनने होते...
मित्र: भावा तू आज काय केलंस?
आरोपी: हा
मित्र: भावा तू चाकूने मारलं?
आरोपी: तुला कोणी सांगितलं?
मित्र: कॉल कर, चॅटवर नाही बोलू शकत.
आरोपी: नको नको..
मित्र: तूझं नाव पुढे आलंय, म्हणून विचारलं.
आरोपी: आता मोठा भाऊ सोबत आहे, त्याला माहीत नाही. तुला कोणी सांगितलं?
मित्र: त्याचा मृत्यू झालाय बहुतेक.
आरोपी: कोण होता तो?
मित्र: चाकू तू मारला ना? तेच विचारतोय.
आरोपी: हा मग.
मुलाने चॅटमध्ये पुढे लिहिलंय, नययने त्याला धमकी दिली होती. तू कोण आहेस? तू काय करणार आहेस? असं तो त्याला म्हणाला होता. म्हणून मुलाने नयनवर हल्ला केला. यावर मित्र म्हणतो, थोडंच मारायचं होतं ना. जीव का घेतलास. यावर आरोपी अत्यंत सहजपणे म्हणाला, जाऊदे, जे झालं ते झालं. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नयन शाळेच्या इमारतीत प्रवेश करताना दिसत होता. तो त्याच्या हाताने जखम दाबत होता. त्याला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तो वाचू शकला नाही.
महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या सुरक्षा रक्षकाने आरोपीला शाळेच्या मागे धावताना पाहिलं होतं. यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला बाल कायद्यांतर्गत ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सुरक्षेची मागणी करत विद्यार्थी आणि पालकांनी अहमदाबादमध्ये विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत.
घटना कशी घडली?
ही घटना शाळेच्या अगदी बाहेरच घडल्याचं सांगितलं जात आहे. दहावीचा एक विद्यार्थी शाळेसमोरील मनिषा सोसायटीच्या गेटवर उभा होता. त्यावेळी आठवीतील एका विद्यार्थ्यासोबत त्याचे भांडण झालं. यावेळी इतर काही विद्यार्थीही तिथे हजर होते. आठवीच्या विद्यार्थ्याला राग आला आणि त्याने खिशातून चाकू काढला आणि विद्यार्थ्यावर हल्ला केला आणि पळून गेला. यानंतर नयन शाळेच्या मागच्या बाजूला जाऊ लागला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिलं आणि शाळा प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली.