चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. शहरातील इंदिरानगर मध्ये सहारे यांचे घर आहे. त्यांच्या घराची जवळपास 4 तास शोध अभियान राबविण्यात आले.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान राबवले आहे. या अभियाना अंतर्गत सहारे यांना हत्यारं विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली.या धाडीत एक तलवार, 1 मॅग्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत.
ट्रेंडिंग बातमी - ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
सहारे याच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे. उबाठा गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख या पदावर असलेल्या विक्रांत सहारे याच्यावरील कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवाय ऐवढ्या मोठ्या प्रमाणात काडतूसे त्यांना कशासाठी लागत होती याची चौकशीही आता केली जाणार आहे.