Wife Killed Husband due to Unemployment : पती-पत्नीच्या नात्यामध्ये वाद होत असतो. मात्र कधी कधी या वादाचं रुप इतकं भयाण होतं की त्याचा सामना करणं सर्वसामान्यांना अवघड जातं. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीच्या बेरोजगारीला कंटाळून त्याची हत्या केली. हैराण करणारी बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला पतीच्या मृतदेहाशेजारी बसून मेकअप करीत होती. हा सर्व प्रकार पाहून शेजारीही हादरले आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना भागातून हा भीषण प्रकार समोर आला आहे.
पतीला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव सुरेश (६० वर्षे) आहे. तो आधी ऑटोरिक्षा चालवित होता. मात्र आजारपणामुळे त्याने काम बंद केलं. यामुळे त्याची पत्नी पूनम नाराज होती. शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नियमित भांडणं होत होती. पत्नी पतीला मारहाण करीत होती. ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
नक्की वाचा - Faridabad firing case : वाट पाहिली अन् मुलीच्या समोर झाडल्या गोळ्या; प्रेमात वेडा झालेल्या तरुणाचा भयंकर Video
वीट आणि दांडक्याने मारहाण...
ज्या दिवशी महिलेने पतीची हत्या केली, त्या दिवशी सकाळी पूनम आणि सुरेशमध्ये खूप वाद झाला होता. त्यानंतर पुनमने पतीला वीट आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये सुरेशचा जागीच मृत्यू झाला. मात्र यानंतर पुनमचं वागणं भयंकर होतं. तिने पतीच्या मृतदेहाशेजारी खाट लावली आणि त्यावर बसून केस विंचरू लागली. फणीने पतीच्या तोंडावर मारलं आणि मृत पतीच्या कानशिलात लगावली. नईदुनियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आरोपी पुनम पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू...
आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तर तेही हादरले. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आरोपी पूनम हिला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. महिलेला मानसिक आजार होता का, याबाबतची तपास केला जात आहे.